लाल डब्याचो राजा



पावसाळ्याचे दिवस होते. कोकण रेल्वे मधून पावसाचा अनुभव घेण्यासाठी दिवा सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन ने प्रवास करत कणकवलीत पोचलो, घड्याळात रात्रीचे ७.४५ वाजले होते, शेवटची st ८ वाजता निघते ती कशाही परिस्थितीत पकडायची म्हणून घाईघाईने रिक्षा करून बस स्थानकात पोचलो. पावसाच्या हलक्या सरी चालूच होत्या.
'८ वाजता सुटणारी कणकवली-कळसुली फलाट क्रमांक ७ वर उभी आहे, हळवल-शिरवल कळसुली जाणारी बस फलाट क्रमांक ७ ' 
स्पीकर वर उद्घोषणा ऐकू येताच बॅग उचलुन फलाटाच्या दिशेने निघालो, एव्हाना st पूर्ण भरली होती, कशीबशी एक सीट मिळाली. पाऊस होता थोडं भिजायला झालंच होतं ,बॅग भिजू नये म्हणून वरच्या रॅक वर ठेवली. थोड्याच वेळात st चालू झाली अन गावच्या दिशेने निघाली.
       "नितीना, खय रे , आता इलस काय? "
कंडक्टर चा आवाज ऐकू आला, बघतो तर ते ओळखीचे कंडक्टर होते, कॉलेजमध्ये असताना महिन्याभराच्या प्रवासात त्यांची ओळख झाली होती. 
"रासमानू, आज तुम्ही वस्तीक आसास? आपला माणूस या भावनेने मी त्यांना प्रतिप्रश्न केला. मग त्याच्या बाजूला जाऊन बसलो अन गप्पा चालू झाल्या. कंडक्टर ची ड्युटी किती त्रासदायक असते ,जवळपास १५ वर्षांचा अनुभव कसा होता ते सांगत होते . 
   दुपारी १२ वाजता चालू झालेली ड्युटी दुसऱ्या दिवशी दुपारी १ च्या आसपास संपते, रात्रीची वस्ती गाडीत नाहीतर जवळपास कुठे निवासाची सोय असेल तिथं करावी लागते. वाहक म्हणून त्यांचे अनुभव खूप काही सांगून जात होते. कधी प्रवाशांची तुफान गर्दी, वेळेवर गाडी उपलब्ध न होणे, दुर्गम भागात वस्तीला रहाणे,ताब्यात असलेल्या st ची पुर्ण चालक अन वाहक यांची असते, शाळकरी मुलांची कधीच गैरसोय होऊ नये, त्यांची शाळा चुकू नये म्हणून कितीही गर्दी असली तरी त्यांना गाडीत प्रथम प्राधान्य देणे, कोकणातील तुफान पाऊस सोबत रस्त्यावर पडलेली झाडे, नदी,ओढ्यावर येणारे पाणी ह्या समस्या आहेतच, तिकिटांच्या पैशांचा अचूक हिशोब देणे, सणासुदीला देखील केवळ प्रवाशांच्या सोईसाठी कामावर हजेरी लावणे, स्वतःच्या घरात गणपती , मंगलकार्य असूनही पूर्णवेळ देता येत नाही, पूर्वी st गाडीमध्येच झोपावं लागायचं, मच्छर चा त्रास सगळं काही सोसत केवळ प्रवाशी हितासाठी काम करत आहेत.
  चालक लोकांचे तर याहून बिकट हाल असतात. आपल्या ताब्यात बस घेणे, दुपारचे कडक ऊन त्याने तापलेली गाडी , तुफान पाऊस,कधी कधी जास्त पडणारी थंडी यांचा सामना करावा लागतो. बस बंद पडली तर ती शक्य असल्यास दुरुस्ती करणे, टायर बदलणे अशी कामे पण करावी लागतात, हाथ दाखवा st थांबवा असं असल्याने कितीही गर्दी असली तरी थांबवावी लागतेच, आपल्या सोबत सर्व प्रवाश्यांची काळजी ही चालकाला घ्यावी लागते.
पंढरपूर वारी, गणपती सण, उन्हाळी सुट्ट्या यावेळी जादा गाड्या प्रशासन सोडत असते,त्यावेळी अतिरिक्त ड्युटी करावी लागते.

    एव्हाना माझे उतरण्याचा बस स्टॉप आला होता.डोक्यात विचारचक्र चालू होतंच. इतकं काम करतात तर त्यांना  तेवढा मोबदला मिळत असेलच ना. महिना सुट्ट्या पण असतीलच. माहिती घेण्याचं ठरवलं अन जे समोर आले ते धक्कादायक होतं ..
१-  एस.टी. चालक, वाहकांचे वेतन पाहिले तर तुम्हाला धक्का बसेल. वर्षभराच्या हंगामी सेवेनंतर कायम सेवेत चालकांना १२ हजार व वाहकांना ११ हजार पाचशे इतकेच वेतन मिळत आहे, एस.टी. ही राज्य सरकारची सेवा असली व या खात्यासाठी स्वतंत्र मंत्री असले तरी राज्य सरकारच्या सेवेतील इतर चालकांचा पगार व एस.टी.तील चालकांचा पगार यांच्यात आत्ताच प्रचंड तफावत आहे. एवढंच काय तर शेजारच्या राज्यात तिथल्या कर्मचाऱ्यांना जास्त वेतन मिळतो. चालक, वाहक यांचा सरासरी पगार हा खालीलप्रमाणे आहे 
महाराष्ट्र- 4350 ते 14225 रुपये
तेलंगणा- 12340 ते 32800
कर्नाटक- 11640 ते 15700
राजस्थान- 5200 ते 20200
उत्तर प्रदेश- 5200 - 20200 
याशिवाय इतर राज्यातील चालक आणि वाहकांना दीड हजार ते दोन हजार रुपये ग्रेड पे दिला जातो. पण महाराष्ट्रात ग्रेड पे मिळत नाही. इतर राज्यात प्रवासी कर 5 ते 7 टक्के इतका आहे, तर महाराष्ट्रात हा प्रवासी कर 17.5 टक्के इतका आहे. असं असूनही महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर राज्यांच्या तुलनेत कमी का? दिवाळी बोनस बेस्ट कर्मचाऱ्यांना तोट्यात असूनही ५५०० रु मिळतो तर रापम च्या कर्मचाऱ्यांना २५०० रु. 

२ -  एस.टी. महामंडळ भ्रष्टाचार व गैरप्रकारांनी पोखरले आहे तर दुसरीकडे गावोगावी फोफावलेल्या रिक्षांपासून टमटमपर्यंत आणि बसपासून एसी आरामबसपर्यंत सर्वांनी एस.टी.चा धंदा मारला आहे. बस डेपोत घुसून प्रवाशी खाजगी गाडीत नेले जातात.
   आज कोकणात तरी st ही अजूनही जीवनवाहिनी ठरत आहे, शाळकरी मुलांचा निकालात st चाही मोलाचा वाटा आहे, वाट पाहीन पण एसटी नेच जाईन असं आजही लोकांना वाटतंय गरज आहे ती आधुनिकीकरण करण्याची. प्रवाशी आपल्या जवळ कसे येतील हे शोधण्याची. 
आज आपल्या महामंडळाला ७० वर्षे होतायत. शुभेच्छा तर आहेतच सोबत कर्मचाऱ्यांच्या  उत्तम आरोग्यासाठी शुभकामना. 
जाता जाता एक छोटीशी आठवण 

महाडची सावित्री नदी दुर्घटना, 
 वयाची पन्नासी गाठलेला चालक राजापूर-मुंबई बस घेऊन निघाला, अपघात झाला,   
दोन दिवसांनी अपघाती बसचे तुकडे मिळाले . 
त्यात मुख्य इंजिन चा भाग आणि चालकाची सीट मिळाली त्याबरोबर 
गाडीचा हॅन्ड ब्रेक ओढलेल्या अवस्थेत सापडला 
बस . 
या पलीकडे नाही लिहू शकत
सलाम तुमच्या त्यागाला, निष्ठेला अन तुमच्या सोबत असणाऱ्या कुटुंबाला...
#एसटीमाझीआसा 

शब्दांकन- नितीन नाईक- कणकवली 
              (८१०८२१८०९२) 
           #मालवणीझिलगो
ट्विटर @minitinnaik  

Comments

Popular posts from this blog

प्रश्नांचा उत्तर

तात्या परत इले